Retreating Monsoon : परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार

Retreating Monsoon : परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार

 

Retreating monsoon ; मान्सूनचा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मान्सूनचे वारे दोन दिवसांत वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या परतीच्या काळात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने परतीचा पाऊस राज्याला झोडपून काढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

राज्याच्या विविध भागात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा कडाका वाढला आहे. सप्टेंबर महिन्यातच राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसू लागला आहे. अनुकूल हवामानामुळे वादळी वारे आणि पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन आठवडे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात 10 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्यानंतरही दक्षिण जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

 

 

येत्या दोन आठवड्यांत सोलापूर, सांगली, धाराशिव जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त तर नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर जिल्ह्यांतील काही भागात सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत राज्याच्या सर्वच भागात मुसळधार पावसाची शक्यता असून, दक्षिण कोकण आणि घाटमाथ्यामध्ये पावसाची तीव्रता अधिक राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानंतरही आठवडाभर (3 ते 10 ऑक्टोबर) राज्यभर पावसाचे संकेत आहेत.

 

 

नवरात्रोत्सवात पावसाचा जोर वाढणार आहे

 

मान्सूनचा परतीचा प्रवास यंदाही लांबला असून, देशातील प्रमुख भागांतून मान्सून उशिराने माघार घेण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर-पश्चिम भारतात थोडा पाऊस असल्याने नैऋत्य मान्सून पश्चिम राजस्थान आणि कच्छ भागातून 23 सप्टेंबरपर्यंत माघारीस सुरू होऊ शकतो. तथापि, हवामान खात्याच्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार, कमी दाबाच्या निर्मितीमुळे 23 सप्टेंबरच्या आसपास बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे मध्य भारत (मध्य प्रदेश, छत्तीसगड) आणि महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अनुपम कश्यपी म्हणाले.

 

 

कमी दाब प्रणालीच्या संभाव्य हालचालीमुळे मध्य भारत आणि महाराष्ट्रात दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात (27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर) पावसाची तीव्रता वाढू शकते. पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने प्रणालीच्या हालचालीमुळे पावसाची तीव्रता अधिक असू शकते. चौथ्या आठवड्यापासून पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तयारी करून त्यानुसार नियोजन करावे, असे डॉ.कश्यपी म्हणाले

Leave a Comment